जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 2071 बेड उपलब्ध
यवतमाळ, दि. 7 जून : गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण दुप्पट आहे. जिल्ह्यात 27 जण पॉझेटिव्ह तर 81 जण कोरोनामुक्त झाले असून आज एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही हे विषेश.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 2963 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 27 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 2936 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 763 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 313 तर गृह विलगीकरणात 450 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72419 झाली आहे. 24 तासात 81 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 69877 आहे. आतापर्यत जिल्ह्यात एकूण 1779 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 50 हजार 721 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 77 हजार 523 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.13 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 091 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.
पॉझेटिव्ह आलेल्या 27 जणांमध्ये 18 पुरुष आणि 9 महिला आहेत. यात दारव्हा येथील 6, दिग्रस येथील 5, मारेगाव येथील 1, पांढरकवडा 1, पुसद येथील 9, राळेगाव 1, वणी येथील 1, यवतमाळ येथील 3 रुग्ण आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2071 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 208 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2071 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 79 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 498 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 75 रुग्णांसाठी उपयोगात तर 451 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 54 उपयोगात तर 1122 बेड शिल्लक आहेत.
___________________________
व्यापारी वर्गाकडून कोविड नियमांचे पालन आवश्यक
– जिल्हाधिकारी अमोल येडगे
यवतमाळ, दि. 7 जून : यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी लॉकडाउनमध्ये दाखविलेल्या संयमामुळे राज्य शासनाच्या सुधारित नियमावलीनुसार यवतमाळ जिल्हा लेव्हल वन मध्ये आल्याने व्यापाराशी संबंधीत सर्व बाबी अनलॉक करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर व्यापारी प्रतिष्ठान व दुकानांच्या माध्यमातून जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण पुन्हा वाढू नये यासाठी व्यापारी वर्गाने कोविड नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकारी यांचे समवेत जिल्हाधिकारी यांनी अनलॉक संदर्भात चर्चा केली, यावेळी त्यांनी वरील सूचना केल्या. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, चेंबर ऑफ कॉमर्सचे राजेंद्र निमोदिया, गणेश गुप्ता, राधाक्रीष्ण जाधवाणी, शशांक देशमुख, विशाल पोबारू, जगदीश शर्मा इ. प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी येडगे यांनी कोरोना संक्रमण टाळण्यासाठी व्यापारी वर्गाला प्रशासनातर्फे काय अपेक्षीत आहे अशी विचारणा करून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगितले. व्यापाऱ्यांनी देखील ‘नो मास्क, नो एन्ट्री’, सुरक्षीत अंतराचे पालन व हात धुणे या त्रीसुत्रीचे पालन करावे. व्यापारी वर्ग सुपरस्प्रेडर संवर्गात येत असल्यसाने त्यांनी जबाबदारीपुर्वक आपल्या आस्थापनेवरील सर्व कामगारांचे तातडीने लसीकरण करून घेण्याची खबरदारी घ्यावी. कोरोनाचा प्रसार वाढू नये व जिल्हा लेव्हल वन मध्ये राहावा यासाठी सर्वाचे सहकार्य अपेक्षीत असल्याचे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.
यावेळी व्यापारी संघटनांतर्फे कॉमर्सचे राजेंद्र निमोदिया, गणेश गुप्ता, राधाक्रीष्ण जाधवाणी यांनी कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी प्रशासनाला सर्व सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.
_________________________
म्युकरमायकोसिस जनजागृती व मदतीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन
दुरध्वनी क्रमांक अथवा मोबाईल क्रमांकावर मिळेल माहिती
यवतमाळ, दि. 7 जून : जिल्हयात १ मार्च २०२१ ते ३१ मे २०२१ या कालावधीमध्ये ५४ हजार ३४९ एवढे रुग्ण कोविड-१९ ह्या आजाराने बाधित झाले होते. कोरोना बाधित रुग्णांना कोरोनातून बरे झाल्यानंतर म्युकरमायकोसिसचा धोका असतो. त्यामध्येही अनियंत्रित मधुमेह, कमी प्रतिकार शक्ती असणारे रुग्णांना याचा अधीक धोका असतो. त्यामुळे म्युकरमायकोसिस या रोगासंबधी जनजागृती होण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ, येथे प्रशासकीय अधिकारी डॉ. नानासाहेब देशमुख व डॉ. तेजेश्वर भगत यांची जिल्हास्तरावर नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यातआली असून जिल्हा कार्यालय बचत भवन येथे म्युकरमायकोसिस रोगाची जनजागृती, व मदत मिळण्याकरीता नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. सदर नियंत्रण कक्षात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची प्रकृतीबाबत माहीती घेण्याकरीता ४० शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून आतापर्यंत ४८६५ रुग्णांना दूरध्वनीद्वारे संपर्क करण्यात आला असुन त्यापैकी ४५ रुग्णांना म्युकरमायकोसिसची संशयीत लक्षणे आढळली असुन जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ कार्यालयातर्फे सदर रुग्णांची पडताळणी करुन पुढील कार्यवाही करण्यात आली आहे.
- म्युकरमायकोसिस रोगाशी संबंधित लक्षणे जसे नाक चोंदणे किंवा नाकातुन रक्त येणे, चेहऱ्यावर सुज व वेदना होणे, तोंडात काळे डाग किंवा रक्ताचे डाग असणे, दात/जबडा/हिरडया यावर सुज किंवा वेदना होणे, डोळे लाल होणे, सुजणे, दुखने किंवा दृष्टी कमी होणे किंवा एकाच वेळी दोनदा दिसणे असे कोणतेही लक्षणे आढळल्यास अथवा म्युकरमायकोसिस रोगासंबंधी कोणतीही माहिती हवी असल्यास मदत केंद्र दुरध्वनी क्रमांक ०७३२-२५५०७७/२४०७२० व संपर्क करावा अथवा मोबाईल क्रमांक ७२७६१९०७९० वर व्हॉटसअप करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात येत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.



