मुंबई १३ मे –
परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, BJPचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेत परब यांच्याबाबत एक तक्रार केली आहे. ही तक्रार परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टबाबत आहे. हा रिसॉर्ट परब यांनी काळ्या पैशातून बांधल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. फक्त जावडेकरच नाही तर सोमय्या यांनी याबाबत ED, CBI, आयकर विभाग आणि महसूल मंत्रालयाकडेही तक्रार केली आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्ली येथे मी भेट घेतली. मंत्री अनिल परब यांनी लॉक डाऊन दरम्यान रत्नागिरी येथील दापोली येथे १० कोटीचा बेकायदेशीर साई रिसॉर्ट बांधला. त्याचा तपास करण्यासाठी दिल्लीहून पर्यावरण मंत्रालयाची विशेष टीम जाणार. ED, CBI, आयकर विभाग, महसूल मंत्रालय कडे ही मी तक्रार केली आहे’, असं ट्वीट करत सोमय्या यांनी याबाबत माहिती दिली आहे.
किरीय सोमय्या यांच्या या आरोपांवर अनिल परब यांनीही उत्तर दिल आहे. पत्रकारांनी सोमय्यांच्या आरोपांबाबत विचारले असता, सोमय्यांच्या आरोपांना आम्ही त्या त्या प्लॅटफॉर्मवर उत्तर देऊ, असे अनिल परब म्हणाले.



