वैद्यकीय महाविद्यालय व कोव्हीड केअर सेंटर भेट
सर्व सोयीसुविधा युक्त 16 रुग्णवाहिका तातडीने घेण्याचे नियोजन
यवतमाळ, दि. 20 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या तसेच मृत्युचा आकडासुध्दा दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी शासन –प्रशासन एकजुटीने काम करीत असून कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात येतील, असे राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.
नियोजन सभागृहात जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्षा कालिंदा पवार, खासदार भावना गवळी, खासदार बाळू धानोरकर, विधान परिषद सदस्य सर्वश्री आमदार वजाहत मिर्झा, दुष्यंत चतुर्वेदी, निलय नाईक, विधानसभा सदस्य आमदार संजय राठोड, डॉ. अशोक उईके, डॉ. संदीप धुर्वे, संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील आदी उपस्थित होते.
जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी आणि मृत्युदर कमी करायचा असेल तर टेस्टिंग आणि लसीकरणाची गती वाढविणे आवश्यक आहे, असे सांगून पालकमंत्री भुमरे म्हणाले, ग्रामीण स्तरापर्यंत उपचाराची सुविधा निर्माण करण्यासाठी प्रशासनाला सुचना केल्या आहेत. तसेच डॉक्टरांची उपलब्धता होण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे. रेमडेसीवीर इंजेक्शन आणि ऑक्सीजनचा पुरवठा जिल्ह्यात कमी पडू दिला जाणार नाही.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 100 ऑक्सीजन बेड व 10 व्हेंटीलेटर पुढील आठवडाभरात सुरू करण्याचे नियोजन आहे. स्त्री रुग्णालय येथे 100 बेड, उमरखेड ग्रामीण रुग्णालयात आठवडाभरात 30 ऑक्सीजन बेडची व्यवस्था, वणी ग्रामीण रुग्णालयात 50 ऑक्सीजन बेडचे डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर कार्यान्वित करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच जिल्ह्यात आठ ठिकाणी पीएसए ऑक्सीजन प्लाँट बसविण्यात येणार आहे. नियोजन समितीच्या निधीतून 16 तालुक्यासाठी 16 सुसज्ज रुग्णवाहिका घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे नागरिकांनी स्वत:ची व कुटुंबाची जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच कोरोनाला हरविण्यासाठी मास्कचा नियमित वापर, सामाजिक अंतराचे पालन, वारंवार हात धुणे, लक्षणे आढळताच चाचणी करणे, पात्र नागरिकांनी लसीकरण करणे या पंचसुत्रीचा वापर करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. यावेळी त्यांनी एकूण रुग्णसंख्या, सद्यस्थितीत असलेले ॲक्टीव्ह पेशंट, बेडची उपलब्धता, ऑक्सीजनचा पुरवठा, नियमित होणारे टेस्टिंग आणि ट्रेसिंग आदींचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी वाघापूर रोडवरील कोव्हीड केअर सेंटर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन पाहणी केली.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांनी मानले. बैठकीला वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार व आमदारांनी अनेक सुचना केल्या. यात टेस्टिंगची संख्या वाढविणे, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये सर्व सोयीयुक्त करणे, शासनाच्या सुचनेप्रमाणे बीएएमएस आणि बीएचएमएस तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशीप करणा-या डॉक्टांनी सेवा घेणे. प्रसंगी या विद्यार्थ्यांचे मानधन वाढविणे, कंपन्याचा सीएसआर फंड केवळ कोरोनाच्या कामाकरीता वापरणे, रेमडेसीवीर कोणाला आवश्यक आहे व कोणाला नाही, याबाबत जनजागृती करणे आदी सुचनांचा समावेश होता.
850 जण पॉझेटिव्ह ; 788 जण कोरोनामुक्त
29 मृत्यु, 4 जण इतर जिल्ह्यातील
यवतमाळ, दि. 20 : जिल्ह्यात मंगळवारी 29 मृत्युसह 850 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विविध कोव्हीड सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटर येथे भरती असलेल्या 788 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 5749 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 850 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4899 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5753 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2915 तर गृह विलगीकरणात 2838 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 42307 झाली आहे. 24 तासात 788 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 35602 आहे. तर जिल्ह्यात एकूण 923 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.90 असून मृत्युदर 2.25 आहे.
गत 24 तासात जिल्ह्यात एकूण 29 मृत्यु झाले. यातील 25 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर चार मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 82, 35, 45 वर्षीय पुरुष आणि 68, 83, 29 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 71 वर्षीय पुरुष, पांढरकवडा शहरातील 51 व 83 वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 33 व 63 वर्षीय पुरुष, बाभुळगाव येथील 54 वर्षीय पुरुष, उमरखेड येथील 52 वर्षीय पुरुष, घाटंजी येथील 44 वर्षीय पुरुष, वणी तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, राळेगाव तालुक्यातील 58 वर्षीय महिला, पुसद येथील 46 वर्षीय पुरुष, आर्णि तालुक्यातील 42 वर्षीय महिला, दिग्रस येथील 81 वर्षीय महिला, आर्णि शहरातील 36 वर्षीय महिला, राळेगाव शहरातील 40 वर्षीय पुरुष, नागपूर येथील 49 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला, माहूर येथील 60 वर्षीय महिला आणि वर्धा येथील 57 वर्षीय पुरुष आहे. तर खाजगी रुग्णालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 70 वर्षीय पुरुष, उमरखेड येथील 52 वर्षीय महिला आणि वणी येथील 56 व 66 वर्षीय महिलांचा समावेश आहे.
मंगळवारी पॉझेटिव्ह आलेल्या 850 जणांमध्ये 529 पुरुष आणि 321 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 256 पॉझेटिव्ह रुग्ण, पांढरकवडा 89, उमरखेड 27, दिग्रस 73, पुसद 61, वणी 41, कळंब 32, नेर 19, बाभुळगाव 13, घाटंजी 54, मारेगाव 18, राळेगाव 4, महागाव 14, दारव्हा 87, आर्णि 23, झरीजामणी 33 आणि इतर शहरातील 6 रुग्ण आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 355535 नमुने पाठविले असून यापैकी 352047 प्राप्त तर 3488 अप्राप्त आहेत. तसेच 309740 नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आहे.
जिल्ह्यातील रुग्णालयात असलेल्या बेडची उपलब्धता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 545 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 32 बेड शिल्लक आहेत. जिल्ह्यातील चार डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये एकूण 240 बेडपैकी 105 रुग्णांसाठी उपयोगात, 135 बेड शिल्लक, जिल्ह्यातील 31 कोव्हीड केअर सेंटरमध्ये एकूण 2453 बेडपैकी 1643 उपयोगात तर 810 शिल्लक आणि 20 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 729 बेडपैकी 535 उपयोगात तर 194 बेड शिल्लक आहेत.
अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत
यवतमाळ, दि. 20 : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व प्रकारची जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा अंतर्गत असलेली आस्थापना, दुकानांची वेळ आता सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत करण्यात आली आहे.
यात सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई सर्व प्रकारच्या खाद्य पदार्थांची दुकाने, चिकन, मटन, मच्छी आणि अंड्यांची दुकाने, कृषी संबंधित दुकाने, बियाणे, खते आणि शेती अवजारे व त्याची दुरुस्ती इ. सेवा, पशुखाद्याची दुकाने, मान्सुन पूर्व कामकाज करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने दिनांक 21 एप्रिल 1 मे 2021 पर्यंत सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. सर्व प्रकारची हॉटेल व उपहारगृह यामधून पुरविण्यात येणारी होम डिलेव्हरी सेवा सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरु राहतील. (कोणालाही हॉटेल व उपहारगृहामध्ये ऑर्डर देण्यासाठी किंवा खाद्यपदार्थ घेऊन जाण्याची मुभा राहणार नाही.)
तसेच सर्व प्रकारची रुग्णालये, डायग्नोस्टीक सेंटर, क्लिनिक्स, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालय, औषधी दुकाने व औषधी कंपन्या, औषधी व आरोग्य सेवा व औषध निर्मिती करणारे कारखाने तसेच त्याचे वितरण, वाहतूक व्यवस्था, लस, सॅनिटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरणे व तत्सम बाबी, कच्चा माल युनिट आणि त्यासंबंधीत सेवा इत्यादी, पशुवैद्यकीय दवाखाने व त्याची औषधांची दुकाने, पेट्रोलपंप व पेट्रोलियम पदार्थ संबंधीत उत्पादने, विद्युत आणि गॅस पुरवठा सेवा, एटीएम, टपाल सेवा या कार्यालयाचे आदेश दिनांक 14 एप्रिल 2021 मध्ये नमूद केल्यानुसार सुरु राहतील. तसेच शासकीय कार्यालये, परवानगी असणारे खाजगी कार्यालये, बँका ह्या त्यांचे कार्यालयीन वेळेनुसार सुरु राहतील.
सदर आदेश यवतमाळ शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील. आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.



