यवतमाळ, दि. 12 : गत 24 तासात जिल्ह्यात तीन मृत्युसह 365 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 230 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ यवतमाळ तालुक्यातील 78 वर्षीय पुरुष, पुसद शहरातील 41 वर्षीय पुरुष आणि दिग्रस तालुक्यातील 69 वर्षीय पुरुष आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या 365 जणांमध्ये 219 पुरुष आणि 146 महिला आहेत. यात यवतमाळातील 115, पुसद 83, आर्णि 28, कळंब 24, बाभूळगाव 22, दारव्हा 20, दिग्रस 17, नेर 16, पांढरकवडा 16, वणी 13, राळेगाव 4, घाटंजी 1, महागाव 1, उमरखेड 1 आणि इतर ठिकाणचे 4 रुग्ण आहेत.
शुक्रवारी एकूण 1597 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 365 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1232 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2358 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 20919 झाली आहे. 24 तासात 230 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 18063 आहे. तर जिल्ह्यात एकूण 498 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 180224 नमुने पाठविले असून यापैकी 178580 प्राप्त तर 1644 अप्राप्त आहेत. तसेच 157661 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
______________________&&______
सुपर स्प्रेडरसह बाजारपेठ व विविध आस्थापनांमधील सर्वांची चाचणी करा
जिल्हाधिका-यांनी घेतला तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा
यवतमाळ, दि. 12 : जिल्ह्याचा कोरोनाबाधित रुग्णांचा दर हा 13 टक्क्यांवर पोहचला आहे. हा दर पाच टक्क्यांपर्यंत खाली आणायचा असेल तर चाचण्यांची संख्या वाढविणे हा एकमेव पर्याय आहे. त्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी तालुकानिहाय चाचण्यांचे उद्दिष्ट निर्धारीत करून दिले आहे. या उद्दिष्टांची गांभिर्यपूर्वक पुर्तता करण्यासाठी सुपर स्प्रेडरसह बाजारपेठ तसेच विविध आस्थापनांमधील सर्व कर्मचा-यांची चाचणी करा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात व्हीसीद्वारे तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते.
जिल्ह्याला दिलेले पाच हजार चाचण्यांचे उद्दिष्ट कोणत्याही परिस्थितीत रोज पूर्ण व्हायलाच पाहिजे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्याच्या कोरोना स्थितीबाबत वरिष्ठ अधिका-यांकडून नियमित आढावा घेऊन सुचना दिल्या जात आहे. या सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे तालुकास्तरीय यंत्रणेचे मुख्य काम आहे. रोजच्या उद्दिष्टांपेक्षा कोणत्याही तालुक्याच्या चाचण्या कमी होणार नाही, याची दक्षता घ्या.
यवतमाळ, पुसद, दिग्रस, दारव्हा, बाभुळगाव आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे. गृह विलगीकरणात राहणारे नियमांचे उल्लंघन करीत असल्यामुळे अपवादात्मक परिस्थिती वगळता यापुढे कोणालाही ही सुविधा देऊ नये. दिग्रसमध्ये सर्वांनाच गृह विलगीकरणाची सुविधा का देण्यात आली, याबाबत पुसद उपविभागीय अधिका-यांनी लक्ष द्यावे.
प्रत्येक पॉझेटिव्ह रुग्णांच्या मागे किमान 20 जणांचा शोध घेऊन चाचणी करा. जिल्ह्याचा पॉझेटिव्हीटी दर कमी करायचा असेल तर पुढील संपूर्ण आठवडा गांभिर्याने काम करा. एका आठवड्यात जिल्ह्याच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी तसेच कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले, बाजारपेठ तसेच विविध आस्थापनांमधील सर्व कर्मचा-यांची चाचणी होणे गरजेचे आहे. ज्या आस्थापना याचे पालन करणार नाही, अशा दुकानांना परवानगी नाकारली जाईल. तसेच तालुकास्तरीय समितीने समन्वयातून काम करावे, असे त्यांनी सांगितले.
बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ठमके, डॉ. सुभाष ढोले, डॉ. प्रशांत पवार आदी उपस्थित होते.
___________________&_____
कृषी विभागाच्या विविध योजनांचा जिल्हाधिका-यांकडून आढावा
यवतमाळ, दि. 12 : पात्र शेतक-यांना योजनांचा लाभ त्वरीत मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, डॉ. सुरेश नेमाडे, डॉ. प्रमोद यादगिरवार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अमर गजभिये, समाजकल्याण विभागाचे उपायुक्त भाऊराव चव्हाण आदी उपस्थित होते.
कृषी यांत्रिकीकरणांतर्गत शेतक-यांना अनुदानावर मागणीनुसार पुरवठा झाला पाहिजे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, एका आठवड्यात सदर यंत्र शेतक-याला उपलब्ध करून दिले तर त्याचा त्वरीत फायदा शेतक-यांना मिळू शकतो. पात्र शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला ट्रॅक्टरची आवश्यकता असेल तर ते देण्याचे नियोजन करावे. पोकरा अंतर्गत शेतक-यांना त्वरीत अनुदान उपलब्ध करून द्यावे. तसेच या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्याबाबत कृषी विभागाने कार्यवाही करावी, अशा सुचना त्यांनी दिल्या. यावेळी त्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा), प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, कोरडवाहू क्षेत्र विकास आदींचा आढावा घेतला.
बैठकीला जिल्हा पणन अधिकारी अर्चना माळवे, कृषी विभागाचे पिंपरखेडे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.
