१५ फेब्रुवारी :
शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांतर्फे शनिवारी रात्री ‘ऑपरेशन ऑल आउट’ हे अभियान राबविले. पोलिसांनी शहरातील सुमारे २५९ ठिकाणी कारवाई (कोम्बिंग) करून ३९ फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या. कारवाईत अमली पदार्थ कायद्यान्वये ८८ जणांना अटक करण्यात आली, तर अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या ३७ जणांवर कारवाई करून त्यांच्याजवळील शस्त्र जप्त केली.
शहरातील मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी, पायी गस्त, हॉटेलांची झडती, वस्त्यांमध्ये तपासणी करून पोलिसांनी अभिलेखावरील गुन्हेगारांवर जरब बसविली. कारवाईत पाच प्रादेशिक विभागांचे अतिरिक्त आयुक्त, १३ परिमंडळांचे उपायुक्त, विभागीय साहाय्यक आयुक्त, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि अंमलदार सहभागी झाले होते. शनिवारी रात्री ११ ते रविवारी पहाटे २ पर्यंत पोलिसांनी ही कारवाई केली.



